श्रीरंग बारणेंना खासदार बनवण्यासाठी सुधाकर भाऊ घारेंनी लावली ताकत : कर्जत- खालापूर मतदारसंघात आढावा बैठकांचे सत्र सुरु
मुंबई, 26 एप्रिल, 2024 (TGN): देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशात मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी पार पडत असलेल्या मतदानासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशात मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कर्जत-खालापूर मतदारसंघातही प्रचाराने रंग पकडला आहे.
महायुतीतील तीनही प्रमुख पक्ष श्रीरंग आप्पा बारणेंचा प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनीही आपला जोर लावला आहे. आपल्याला प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे असे आवाहन ते प्रेत्येक सभेत आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करत आहेत. दरम्यान याचाच एक भाग म्हणून सुधाकर घारे यांनी आता जिल्हा परिषद वार्डानुसार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सुधाकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दुपारी कर्जतच्या पक्ष कार्यालयात पाथरज, कळंब आणि नेरळ जिल्हापरिषद वार्डाची आढावा बैठक पार पडली.
यासोबतच सायंकाळी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. एप्रिलच्या अखेरपर्यंत सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत इतर जिल्हा परिषद वार्डांच्या आढावा बैठका संपन्न होणार आहेत. तसेच ३ मे रोजी संपुर्ण कर्जत-खालापूर मतदारसंघातून कर्जतच्या रॉयल गार्डनला मोठ्या सभेच नियोजन करण्यात येत आहे. एकंदरीत महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सुधाकर घारे यांनी आपली यंत्रणा सक्रिय केल्याचे दिसत आहे.Ends (TGN)