
उत्तर मुंबईत सहा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणार – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात कौशल्य विकास केंद्रासाठी सामंजस्य करार संपन्न
मुंबई, ५ सप्टेंबर २०२६ ( TGN ) : उद्योग जगतातील मनुष्यबळाची मागणी पाहता उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्रासाठी पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे. उद्योग जगातील बदलत्या तंत्रज्ञानाला कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्क्युबेशन सेंटर, अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन या केंद्राचा वापर रोजगार निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न आहे. विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाला नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी सांगितले.
कांदिवली येथील ठाकुर व्हिलेज याठिकाणी कौशल्य विकास केंद्रासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार आज (दिनांक ५ सप्टेंबर २०२६) करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या कौशल्य विकास केंद्रासाठी समाज कल्याण सुविधा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.
कौशल्य विकास केंद्रासाठीच्या सामंजस्य करारप्रसंगी मुंबईचे उपमहापौर श्री. संजय घाडी, नगरसेविका श्रीमती निशा परुळेकर, नगरसेवक श्री. दीपक(बाळा) तावडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा – लवंगारे, एनएसडीसीचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी श्री. संजीव सिंह तसेच महिंद्रा समुह आणि लार्सन अॅण्ड टुब्रो समुहाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल म्हणाले की, उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. अशावेळी विविध ठिकाणी कार्यरत मनुष्यबळाने अद्ययावत प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन रोजगाराच्या संधी मिळवायला हव्यात. त्यासाठी सायंकाळच्या वेळी तसेच आठवड्याच्या शेवटी कौशल्य विकास केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षणाचे वर्ग उपलब्ध करून देण्यात येतील. तरुणाईला विविध भाषा आत्मसात व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॕक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्गही याठिकाणी चालविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
उत्तर मुंबईत हॉटेल उद्योग जगताचा होणारा विस्तार पाहता या क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, असेही केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी नमूद केले.
उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, रिअल इस्टेट क्षेत्राने घेतलेली भरारी पाहता त्यादृष्टीने प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे. उद्योग जगताच्या मागणीनुसार अधिक कुशल कामगार वर्ग उपलब्ध करून देण्यात कौशल्य विकास केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उद्योग जगताला हव्या असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा वेळोवेळी केल्यास हे पाऊल आधुनिक भारताच्या दिशेने पुढे जाईल. मुंबईसोबतच ग्रामीण महाराष्ट्रासाठी देखील कौशल्य विकास केंद्रातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपमहापौर श्री. घाडी यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा – लवंगारे म्हणाल्या की, उद्योग जगतासाठी आवश्यक प्रशिक्षण वर्ग उपलब्ध करून देणे यामध्ये कौशल्य विकास केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पायाभूत सुविधांचे निर्माण पाहता अद्ययावत कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यासोबतच उद्योग जगाच्या कुशल मनुष्यबळाची सांगड घालण्यासाठी संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण वर्गासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष क्षेत्रासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होईल. नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात तसेच कुशल मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात कौशल्य विकास केंद्राचा मोलाचा वाटा असेल, असा विश्वास श्रीमती वर्मा लवंगारे यांनी व्यक्त केला.

