सिद्ध अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते हमराही गटाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. मज्जातंतूच्या समस्यांशी झगडणा-या रुग्ण आणि त्यांची काळजी घेणा-यांसाठी हा गट सामुदायिक आधार देईल. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना या गटाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल.
मुंबई, १८ ऑक्टोबर २०२५ ( TGN ): मुंबईतील एस.एल. रहेजा या नामांकित रुग्णालयाने मेंदूतील मज्जातंतूच्या आजाराशी झगडणा-या रुग्णांसाठी न्यूरो सपोर्ट गट सुरु केला आहे. हा गट रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांनाही आजाराशी संबंधित संपूर्ण माहिती पुरवेल. रुग्ण आणि नातेवाईकांना उपचारासंदर्भात आवश्यक मदत तसेच भावनिक आधार देईल. या गटाला ‘हमराही’ असे संबोधले जाईल. हा गट अल्झायमर, अपस्मार, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन्स रोग, पक्षाघात यांसारख्या आजारांबाबत समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. या उपक्रमामुळे मेंदूशी संबंधित आजार आणि मानसोपचार या दोन्हीतील कमतरता दूर होण्यास मदत होईल.
या उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम एस.एल.रहेजा रुग्णालयात पार पडला. यावेळी मेंदूच्या मज्जातंतूंसंबंधित आजाराचे निदान झालेले रुग्ण, काळजीवाहक, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यक्रमात आयोजित चर्चासत्रातून कला आणि सांगितीक उपक्रम राबवून रुग्णांना मिळणारी उपचारात्मक मानसिक शांतता याबद्दल माहिती देण्यात आली. रुग्णांच्या उपचारांसंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही मार्गदर्शन केले. रुग्ण तसेच उपचाराशी निगडीत अनेकजणांत संवाद एकमेकांकडून आधार मिळाला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. खान यांच्या उपस्थितीमुळे या सामाजिक उपक्रमाची सर्व स्तरातून दखल घेतली गेली.
एस.एल.रहेजा हॉस्पिटलच्या मज्जातंतू विभागाचे संचालक डॉ. कौस्तुभ महाजन म्हणाले, ‘‘रुग्णाला अनेकदा मज्जातंतूचे विकार आणि मानसिक आजाराची लागण एकाच वेळी होते. दोन्ही आजार एकाचवेळी उद्भवल्याने कुटुंबीयांसाठी हा काळ फारच कठीण होतो. हमराही हा गट रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांची काळजी घेणारा सोबती म्हणून कार्यरत राहील. रुग्णाला सुरक्षित आणि सहानुभूतीपूर्व वातावरणात मार्गदर्शन देणे, समुदायिक भावना निर्माण करणे तसेच सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन देणे हे या गटाचे मुख्य उददिष्ट आहे.’’
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते अरबाज खान म्हणाले, ‘‘माझ्यासाठी हा उपक्रम फारच महत्त्वाचा आहे. मला आज या कार्यक्रमानिमित्ताने हमराहीचा भाग बनून खरोखरच प्रेरणा मिळाली आहे. यानिमित्ताने मला रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना भेटता आले. या आजाराशी सामना करणारे रुग्ण आणि कुटुंबीयांचे धाडस आणि तत्परता पाहता हा सामुदायिक उपक्रम जागरुकतेकरिता अत्यंत गरजेचा असल्याची जाणीव झाली. रुग्णांना वेळीच आधार मिळणे कितपत महत्त्वाचे आहे तसेच याबद्दल जागरुकता तसेच सर्वांगीण काळजीचे महत्त्त्वही समजले. या प्रवासात रुग्णालयातील वैद्यकीय टीमशी जोडला गेल्याचा मला अभिमान आहे. ’’
एस.एल. रहेजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल पुनामिया म्हणाले, ‘‘ केवळ आजारावर उपचार देणे या विचारापलीकडे जात आम्ही रुग्णाच्या शरीरासह मन आणि हृदयाचीही काळजी घेतो. हमराही हा उपक्रम आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे. या माध्यमातून आम्ही मज्जातंतू आणि मानसिक आरोग्य यांना एकत्र आणले आहे. मानसिक आजारांशी संबंधित कलंक दूर करणे आणि या प्रवासात सोबत राहणारा समुदाय निर्माण करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. ’’
या गटाच्या निमित्ताने केवळ एस.एल. रहेजा रुग्णालयातच नव्हे तर मुंबईतील इतर रुग्णालयांतही मदत दिली जाईल. मुंबईतील सर्व रुग्णालात मज्जातंतूच्या आजारावर उपचार घेणारे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक हा क्यूआर कोड स्कॅन करुन हमराही न्यूरो सपोर्ट गटात सहभागी होऊ शकतात. ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्रुपमध्ये सहभागी होणा-यांना कोणत्याही अडचणीशिवाय नोंदणी करता येईल. रुग्ण तसेच नातेवाईकांसाठी आयोजित सत्रांमध्ये सहभाग घेता येईल. यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि संसाधने मिळवणे सोप्पे होईल. हमराही गटातील सदस्यांना, ज्यात समावेश असेल एस.एल. रहेजा रुग्णालय व अन्य रुग्णालयाचे रुग्ण, रहेजा होम केअर सेवा उपलब्ध केली जाईल
भारतात प्रत्येकी दहा लाख लोकांमागे केवळ एक मेंदूविकारतज्ज्ञ उपलब्ध आहे. ही तफावत भरुन निघण्यासाठी हमराहीची सुरुवात करण्यात आली आहे. हा गट संघटित मार्गदर्शनाची गरज असलेल्या समुदायाला भावनिक, सामाजिक आणि क्लिनिकल आधार देतो. हमराहीमुळे अनेकदा कुटुंबात महत्त्वाचे निर्णय घेणा-या प्रमुख व्यक्तीला योग्य निर्णय घेण्येकरिता आवश्यक असलेली संसाधने, समान अनुभव असलेल्या लोकांशी संपर्क करणे यासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल.
—